August 4, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ ऑगस्ट २०१४

४ ऑगस्ट

वासनेला कसे जिंकता येईल ? 

 



कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे. पोथीत सांगितलेले ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे, तर त्याचा उपयोग. म्हणूनच सर्व प्रचीतींमध्ये आत्मप्रचीती ही उत्तम होय. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी, त्याला मिळवायचे काहीच उरत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो, परंतु तो घालविणे सोपे असते. 'सद्‍गुरूला शरण जा' म्हटले, तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका येणार नाही.
काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत; पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसे खरे, तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून, किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला, देवाचे स्मरण पाहिजे. भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसर्‍या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे. आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून, आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहातात, त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे; तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे, हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्या वेळी आकाशातुन बर्फ पडते त्या वेळी ते अगदी भुसभुशीत असते, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याचप्रमाणे, वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणे फार कठीण जाते. भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणीक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते, ती भगवंताचि वासना होय.


२१७. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या